समता का ? व कशी ? Equity: Why? And how?

समता : का? व कशी?  
Equity: Why? And how?समावेशीत शिक्षणाकडून👈🏻👉🏻 शिक्षणाकडे वाटचाल करताना समता समजून घेणे सर्वांसाठी खूप महत्वाचे आणि गरजेचे आहे.

माणसांमध्ये दोन प्रकारच्या असमानता समजल्या जातातएक-सामाजिक, आर्थिक, धर्म, जात, वर्ग यानुसारची असमानता. दोन- शरीर रचनेनुसार स्त्री, पुरुष, दिव्यांग आणि अन्यलिंगी. पहिल्या प्रकारची असमानता मानवनिर्मित आहे. दुसऱ्या प्रकारची असमानता नैसर्गिक आहे. 

असे असले तरी दोन्ही प्रकारातील माणसे ही “माणसेच आहेत. म्हणून शाळेत आलेले प्रत्येक मूल हे “मूल” आहे. या मुलांकडे जात, धर्म, स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत असे न बघता त्याच्याकडे मूल म्हणून बघावे.

आपल्या राज्यघटनेने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे स्वीकारली आहेत म्हणून समता प्राप्त होणे हा मुलासह प्रत्येकाचाच घटनात्मक अधिकार आहे. 


समता म्हणजे ज्याची जेवढी गरज आहे तेवढं देणं. समानता म्हणजे प्रत्येकाला समान देणं. 

बोलायचं सोपं आहे, प्रत्यक्ष शाळेत कशी कृती करावी हे समजून घेणं अधिक महत्त्वाचे आहे. जी मुलं शाळेत येत नाहीत, ज्यांच्या शिकण्यात अडथळा वाटतोय, ज्यांना वाचता येत नाही ही मुले कोण आहेत? कोणाची आहेत? यांचे पालक कोण आहेत? यातील बहुतांश मुले गरिबांची, मजुरांची, कष्टकऱ्यांची, अदिवासींची, मागासवर्गीयांची, झोपडपट्टीतील, अशिक्षित पालकांची, वेगळी बोली असणाऱ्यांची आहेत. यामध्ये दिव्यांग आणि मुलीसुद्‌धा आहेत. 

दुसरा प्रश्न, जी मुलं शिकत आहेत, ज्यांना वाचता येत आहे त्यांचे पालक कोण आहेत? बहुतांशपणे ज्यांचे आई-वडील सुशिक्षित आहेत, नोकरीला आहेत, घरात शैक्षणिक वातावरण आहे अशांची मुले शिकत आहेत. 

तिसरा प्रश्न, जी मुलं शिकत नाहीत, ज्यांना वाचता येत नाही त्यामध्ये शिक्षक, नोकरदार अधिकारी यांची मुलं आहेत का? असतील तर त्याचं प्रमाण किती आणि वंचित घटकातील या अगोदर चर्चा केलेल्या मुलांचं प्रमाण किती? 

पुढचा प्रश्नजी मुलं शिकत नाहीत, ती का शिकत नाहीत? किंवा इतर मुलांच्यापेक्षा ती मागे का आहेत? प्रत्येक मूल हे माणसाचे मूल आहे. 


सर्व माणसे समान आहेत. प्रत्येक मुलाकडे शिकण्याची क्षमता आहे. ते शिकू शकते तरी काही मुले सर्वांसारखी अपेक्षित असे का शिकत नाहीत?
मूल त्याच्या परिसरातून शाळेत येते तेव्हा ते बरेच काही शिकलेले असते. शाळेत औपचारिक शिक्षणात लेखन- वाचनासारख्या गोष्टी शिकायला सुरुवात होते. ज्यांच्या घरात शैक्षणिक वातावरण आहे ती मुलं थोडंफार शाळेत, पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यापूर्वीच शिकलेली असतात. 

गणितातील संख्याज्ञान, अंकज्ञान झालेलं असतं. काही मुलांची पहिली पिढी शाळेत येत असते. शाळेत मूल प्रवेश घेते त्यावेळी शिकण्याच्या स्तराची असमानता असते. ज्यावेळी वर्गात शिकवायला सुरुवात होते. तेव्हा घरात शैक्षणिक वातावरण असलेली मुलं भरभर शिकत पुढे जातात. त्यांचं कौतुक होतं. आत्मविश्‍वास वाढतो. शिकवणारे भरभर शिकणारांबरोबर असतात. मागचे मागेच असतात. त्यांच्या लेखन, वाचन आणि शिकण्याची सुरुवात शाळेत होते ती ही मुलं असतात. 

आपणास येत नाही. आपल्यात कमतरता आहे. हा न्यूनगंड त्यांच्या मनात निर्माण होतो. त्यांना आत्मसन्मान मिळत नाही. आत्मविश्‍वास कमी होतो. ही मुले अबोल होतात. पाठीमागे बसतात. आम्ही म्हणतो आम्ही सर्वांना समान शिकवलं. ही मुलं शिकत नाहीत यात आमचा काय दोष? हे ज्याचं पोट भरलंय त्याला एक भाकरी देणं आणि जे उपाशी आहेत त्यांनाही एक भाकरी देणं असं झालं. खरेतर जे उपाशी आहेत, ज्यांची भूक अधिक आहे त्यांना अधिक दयायला हवे. त्यांची जेवढी गरज आहे तेवढं दयायला हवं. अगोदर शिकलेल्या मुलांच्याबरोबर ही मुलं येईपर्यंत त्यांना घ्यायलाच हवं.


 आम्ही या मुलांना समान दिले समता दिली नाही

पुढे तर आपण शिकवत राहतो पण जे शिकवतो ते त्यांना समजत नाही कारण आपण शिकवतो त्याच्या खूप मागे असतात ही मुले. शिकवणे आणि न शिकवणे त्यांच्या दृष्टीने सारखं असतं. एखादं झाड तोडलं तर तुटलेल्या बुंध्याला पालवी फुटते. पुन्हा तोडलं तर परत पालवी फुटते. भिंतीच्या फटीत वड, पिंपळाची रोपटी उगवतात. ती तोडली तर पुन्हा पुन्हा पालवी फुटते पण रोप मरत नाही. काहीवेळा भिंत पाडावी लागते पण झाड मरत नाही. प्रत्येक जिवाला जगण्याची अंतरिक प्रेरणा असते. हे नैसर्गिक आहे. झाड जगण्यासाठी एवढं झगडत असेल तर आपली तर माणसांची मुले आहेत. त्यांच्याकडे किती शक्‍ती किती प्रेरणा असेल! प्रत्येक मुलाला शिकायचं आहे. 

शिकणं नैसर्गिक आहे. मग ते भिकाऱ्याचं मूल असो किंवा उद्‌घोगपतीचं असो. ऊसतोड कामगार १२-१३ वर्षाच्या मुलांना ऊसतोड करण्यासाठी आपल्याबरोबर नेतात. या मुलांना मोठ्या माणसांपेक्षा अर्धी मजुरी मिळते. म्हणून त्यांना अर्धा कोयता म्हणतात. अशी खूप मूलं साखर कारखाने सुरू झाले की शाळाबाह्य होतात. वरवंडी तांडा येथील मुलं अशाप्रकारे शाळाबाह्य व्हायची या मुलांना शाळेत थांबवण्यात तिथल्या भरत काळे आणि इतर शिक्षकांनी यश मिळवलय. अर्धे कोयते फडात जात नाहीत.


काही वेळा ऊसतोड कामगारांच्या टोळीचा मुक्काम शाळेच्या जवळ असतो. तिथली लहान मुलं हमखास वर्गाच्या खिडकीतून आत बघत असतात. त्यांना शिकायचं असतं. त्यांना त्याचं बालपण हवं असतं. मुलांत मिसळांव वाटतं. भीक मागून जगणारी मुलं शाळेत येत आहेत. रस्त्यावर, चौकातल्या वाहतूक सिग्नलजवळ वस्तू विकून पोट भरणारी मुलं शाळेत येत आहेत. तरीही शिक्षणाविषयी अनास्था असा शिक्का का मारतो आपण!


जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर; दरोडेखोरांकडून एका घोड्याच्या बदल्यात घेतलेलं गुलामाचं पोर. ते इतकं आजारी आणि अशक्त की कधी मरेल सांगता येत नव्हतं. गोठ्यात राहून, चणे-फुटाणे खाऊन, उपाशी राहून हे मूल शिकतं; शेकडो शोध लावतं. 

एडिसनला आम्ही मतिमंद ठरवतो. शाळेतून बाहेर ढकलतो. त्याला गरजेइतकं देणं खूप दूर. तो शिकतो. रेल्वेच्या डब्यात प्रयोगशाळा तयार करतो. दोन वेळा प्रयोगशाळा जळून खाक होते. तो उमेद हरत नाही. तो शोध लावतो बल्बचा. आम्ही त्याला अंधारात ढकलतो आणि तो आम्हाला प्रकाश देतो.

 अशी खूप उदाहरणे देता येतील ज्यांना शिकायचं होतं. गळायचं नव्हतं तरी आम्ही त्यांना बाहेर ढकललं अशी उदाहरणं दिली की, याकडे आम्ही अपवाद म्हणून बघतो. स्वतःची दृष्टी बदलण्याऐवजी सुटका करून घेतो.

आपण शाळेत शिकत होतो तेव्हा यापैकी बहुतेकांना इंग्रजी शिकण्यात अडथळा येत होता. बाकी सर्व विषयात अडचण नव्हती. असं कसं? इथं ना आपल्या पालकांची शिक्षणाविषयी अनास्था होती ना आपली.शिकवलेलं समजत नाही याचा अर्थ जे मागे आहेत त्यांची शिकण्याची पात्रता नाही, असे नाही. शिक्षणाविषयी अनास्था आहे. असे तर अजिबात नाही. तर अशांसाठी आपण शिकण्याचं वातावरण तयार केलेल नाही. समता आणायची असेल तर याचा विचार करायला हवा. प्रत्येकाला एकच पद्‌धत वापरून कसं समजेल? पद्धत बदलून बघायला पाहिजे. शिकविण्याची साधनं बदलायला हवीत. प्रसंगी शिकविणाराही बदलायला हवा. कधी असे मूल गटात शिकेल, कधी मित्राकडून शिकेल, एखादी गोष्ट दुसऱ्या शिक्षकांकडून शिकेल. 


समता आणायची असेल तर अशा मुलांचा केस स्टडी करायला हवा. शिकण्याचा कृती आराखडा करायला हवा.

कधीतरी मुलाला आपण नकळत काही बोललो रागवलो किंवा दुसऱ्या मुलाला मारलं तरी एखादे मूल भीती बाळगत. मुलाच्या मनात कशाचीही भीती असू शकते. ही भीती त्याच्या शिकण्यातला अडथळा ठरू शकते. हा अडथळा दूर करावा लागेल.


इतर मुलांपेक्षा अशा मुलांना अधिक प्रेमाची, अधिक विश्‍वासाची, अधिक जिव्हाळ्याची गरज आहे. मुलाला शाळेत निर्भय आणि सुरक्षित वाटायला हवं.

शिकविण्याची पद्धत बदलणे, शिकविणरा बदलणे, मुलाला प्रेम देणे, भावनिक पातळीवर आधार देणे या मुलाच्या गरजा आहेत. त्या गरजा पूर्ण करणं म्हणजे मुलाला समता देणे होय. एखाद्याची ती गरज नसेल पण ज्याची आहे, त्याला द्यायला हवं.

 इथं आपण सर्व मुलांची गरज म्हणून इतरांबरोबर देत नाही, तर या मुलाची गरज इतरांपेक्षा वेगळी आहे ती त्याची गरज पूर्ण करणं म्हणजे समता देणं होय. समता देणं म्हणजे त्याच्याशी न्यायानं वागण. बालक कुपोषित आहे म्हणून त्याला फक्त जादा आहार देऊन चालणार नाही, तर त्याला हवा असणारा “विशेष आहार' दयावा लागेल. त्याला हवा तो हवा तेवढा आहार देणं म्हणजे त्याच्याशी न्यायानं वागणं, समतेनं वागणे.

संदर्भ- मूलभूत वाचन क्षमता शिक्षक प्रशिक्षण मार्गदर्शिका


समता ते वाचन क्षमता Equity to reading ability
Previous Post Next Post