आकाशी झेप घेरे पाखरा I Cerebral Palsy Success story

 आकाशी झेप घेरे पाखरा  Cerebral Palsy Success storyआकाशी झेप घेरे पाखरा I Cerebral Palsy Success story

तुज पंख दिले देवाने ....  

 कर विहार सामर्थ्याने ....    

दरि डोंगर हिरवी राने.  ....           

जा ओलांडून जा    ....           

या सरीता सागरा   ....

सोडी सोन्याचा पिंजरा.  ....

आकाशी झेप घे रे पाखरा ....

  सर्वांचे मन जिंकून  ऋषिकेश गात होता.कराओके ठेक्यावर न चुकता व आत्मविश्वासाने....... controll and co-ordination पण शिकत होता प्रत्यक्ष जीवनात आणि पुस्तकात देखील,... हो बारावी विज्ञान शाखेत आणि जगाला दाखवून देत होता" रंग माझा वेगळा"?....... माझ्या डोळ्यातून  अश्रू घळाघळा वाहात होते , हाच का तो ऋषिकेश ....जो  cerebral palsy या असाध्य रोगाने ग्रस्त आहे...... शून्य होता.... अचेतन होता..... गोळा होता...  आणि आज  तोच  इयत्ता दहावी मधे घवघवीत यश प्राप्त करून  सगळ्यांच्या  कौतुकास पात्र ठरला होता . बोटांना  सुद्धा न हलवणारा .... कोणत्या ही वस्तूंना  न पकडणारा .... ऋषिकेश  इयत्ता दहावी ला  रायटर मंजूर असून देखील  त्याला  बॅक बेंच वर बसून  स्वतः हाताने  पेपर लिहिणारा....  आणि  86 .60 टक्के गुण मिळवून  प्रथम येणारा.... पायात पिळ असणारा ..... पायात पाय टाकणारा .... पाऊल न टाकता येणारा .... स्वतःचा कोणताही  तोल न सावरतायेणारा .....ऋषिकेश  आज  गिरीराज  दुर्गराज  रायगड  सर करतो .........पाण्याला प्रचंड घाबरणारा.... आज मात्र  पाण्यात swimming pool मधे  सहज डूबकी मारतो.......ऋषिकेश स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो...... याचा आम्हाला विश्वास प्राप्त झाला आहे यामागे आमची  खडतर तपस्या ते तर आहेच , पण त्याचबरोबर ऋषिकेश ची जिद्द, चिकाटी व इच्छाशक्ती देखील आहे.... सलाम आहे त्याच्या आत्मविश्वासाला ..............

 .....आम्ही ऋषिकेशला शून्यातून बाहेर काढले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही .कारण जन्मानंतर जो चार वर्षे बोलला तर नव्हताच , पण मला आई म्हणून ओळखत ही नव्हता. मी खूप रडायचे की , त्यांनी मला किमान आई म्हणून ओळखावेहाक मारावी पण तसं होत नव्हतं . मी जिद्द सोडली नाही. आज  तो जिथे आहे तेथून त्याला अजूनही खूप पुढे न्यायचे आहे त्याला "जग" दाखवायचे आहे. माणसे ओळखायला शिकवायचे आहे. त्याला एक चांगला माणूस बनवायचे आहे शिक्षणाने अनुभवाने आणि कृतीने ते मला साध्य करायचे आहे हेच माझ्या जीवनाचे साध्य आहे ,हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे .आम्ही याकरिता सर्व पातळीवर लढायला तयार आहोत कारण आम्हाला माहित आहे की जीवनाच्या प्रत्येक पायरीवर संघर्ष आहे आणि तो त्याच्या 'पाचवीला 'च पुजलेला आहे .

 

         एक ऑक्टोबर 2003 ला रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात ऋषिकेश चा जन्म झाला. माझे सात महिने देखील पूर्ण झाले नसतानाच डॉक्टर ने प्रसूती केली. जन्मताच  बाळ रडले नाही .आम्ही धास्तावलो, बाळाला बाळ बालरोगतज्ञ कडे घेऊन जाण्यासाठी महाड कडे निघालो. तोपर्यंत लागलेले जीवघेणे दोन तास आम्ही कसे काढले ते आम्हालाच माहित ..शिवाय बाळाला ऑक्सिजनचा पुरवठा देखील नीट होत नव्हता. त्याची काळजी मनात शंकेचे वादळ निर्माण करीत होती. डॉक्टरांनी तिथे गेल्यावर बाळाला तपासून काचेच्या पेटीत ठेवले.जवळजवळ तीन तासाने सांगितले की बाळ मरण पावले आहे .आम्ही सर्व रडायलाच लागलो .रात्री ची गाडी नव्हती म्हणून सकाळी दवाखाना सोडणार असे सांगून तेथे थांबलो मात्र चार तासाने बाळाने हालचाल दाखवली.. डॉक्टरांना फोन केला लगेच ऑक्सिजन आणि सलाईन लावले गेले. डॉक्टरांना सुद्धा आश्चर्य वाटले ऋषिकेश चा 'पुनर्जन्म 'झाला होता जणू .ऋषिकेश ला दहा दिवसांनी घरी आणले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही करत गेलो. तेल लावू नका, माँलीश करू नका, पण त्याची हालचाल होत नव्हती तो आवाजाकडे लक्ष सुद्धा देत नव्हता, सर्व सामान्य बालकांपेक्षा वेगळी लक्षणे दिसल्यावर  चाळीसगाव येथे डॉक्टरकडे घेऊन गेलो असता बाळाच्या मेंदूची वाढ अपूर्ण असल्याचे सांगितले गेले .ते ऐकल्यावर आम्हाला धक्काच बसला. डॉक्टरांनी पुण्याच्या के. ई .एम. हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यास सांगितले. पुण्याचा डॉक्टरांनी बाळाला सेरेब्रल पाल्सी आहे असे सांगून आपले मूल हे 'विशेष' आहे व कधीही सामान्य होणार  नसल्याचे सांगितले .आम्ही दोघे सुन्न होऊन ऐकत होतो. डॉक्टरांनी थेरपी सुरू करायला सांगितली. महिन्यातून दोन वेळा जाऊ आम्ही थेरपी चे विविध प्रकार समजून घेऊन घरी  आल्यावर जसा वेळ मिळेल तसा थेरेपी करायला लागलो. खेडेगावात राहत असल्यामुळे पाण्यापासून वाण्या पर्यंतच सर्व बाबींची वानवा होती पाणी बाहेरून आणावे लागे, कपडे धुण्यासाठी नदीवर जावे लागे आणि इतरही कामामुळे जास्त वेळ ऋषी करता देता येत नव्हता. ऋषिकेश दोन वर्षाचा होत आला होता. सुधारणा काही दिसत नव्हती. आई म्हणून मला ओळखत होता की नाही याबद्दल मला शंका होती .पायात पिळ होता .पायाच्या शिरा अतिशय कडक होत्या. पायाचीआढी पुन्हापुन्हा काढावी लागत होती. मान न  धरणे, लाळ  गाळणे आणि डोळे वर करणे या लक्षणांचे दुःख त्याच्या 'हसण्या ' ने दूर होत नव्हते .त्याचे 'सतत' चे हसणे देखील मनातून रडवत होते. के. ई .एम.मधून दुसऱ्या हॉस्पिटलचा पत्ता मिळाला .तेथे गेल्यावर दोन्ही पायाची शास्त्रक्रिया सांगितली.  त्यांनी आम्ही फक्त पायाच्या नसा मोकळ्या करू मात्र पायातील पीळ निघेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली. त्यामुळे आमचा धीर खचला . काय करायचे सुचेनासे झाले मात्र एक दिवस दूरदर्शन वरील 'हॅलो डॉक्टर' या कार्यक्रमात रशियन शस्त्रक्रिये विषयी ऐकलं.डॉक्टर अशाच केसच्या बाबत बोलत होते .आशेचा किरण सापडला. आम्ही साडेतीन वर्षाच्या  ऋषी ला घेऊन माहीमला डॉक्टर सुहास शहा यांना गाठले. तिथेच ऋषिकेश वर शस्त्रक्रिया करण्यात आली. पायाची शस्त्रक्रिया होती, पण जादू  झाली आणि ऋषिकेश कंठ फुटल्यसारखा बोलू लागला उच्चार करू लागला. आम्हाला खूप आनंद झाला .त्यानंतर दोन महिने प्लास्टर होते. बेडवरच सर्व त्याने  सर्व त्रास सहन केला.  प्लास्टर काढल्यानंतर कल्याणला फिजिओथेरपी सुरू झाली. त्याच्यामध्ये सुधारणा मला जाणवत होती .तो पाच वर्षाचा झाल्यावर त्याला एका इंग्रजी शाळेत टाकण्यासाठी घेऊन गेलो पण शाळेने प्रवेश नाकारला अशा मुलांची शाळा वेगळी असते हे ऐकून मला तर रडूच कोसळले. पण मी गप्प बसले नाही त्याला घरी जमेल तसे शिकवू लागले. सुदैवाने पुढील वर्षी प्रयोग म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिलीपासून इंग्रजी माध्यम सुरू केले गेले .तिथे त्याला प्रवेश घेतला. रोज शाळेत येऊन जाऊन आठ फेर्या व्हायच्या. तसेच नैसर्गिक विधी आणि इतर शारीरिक अडचणी होत्याच. मात्र या सर्वांवर मात करत त्यांनी सामान्य मुलांच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पार केले, हे साध्य झाले त्याचे गुरू असलेल्या आर. डी . पाटील सरांमुळेच. पुढे पाचवीला माध्यमिक शाळेत घेऊन जाणारा रस्ता खराब होता. पण तशी दोन वर्षे काढली .पुढे सहावीत असताना परत त्याच्या दोन्ही पायांवर शस्त्रक्रिया केली.  कारण तो परत  पाय वाकवायला लागला होता .डावा हात जास्त जड असल्याने त्याला "बोटोक्स" इंजेक्शन देऊन सरळ करण्याचा प्रयत्न केला. त्याने त्यावेळी बराच त्रास सहन केला.

त्यामुळे एका स्टीक वर चालणे ,  सायकल चालवणे या गोष्टी जास्त काळजी घेऊन केल्या.

थोड्याफार आधाराने हे  सारे तो चांगला शिकला. अभ्यास शाळा जमेल तसे  चालू होते .तसेच शाळा दूर असल्याने रस्ता खराब असल्याने नववी पर्यंत शाळा घरीच अभ्यास करून पूर्ण केली. फक्त काही मोजक्या दिवशी तो त्याच्या बाबांबरोबर शाळेत जात होता .

          आमचे अभ्यासाचे वेळापत्रक आणि व्यायामाचे वेळापत्रक ठरलेले आहे .सकाळी साडेपाच पासून सुरू झालेला दिवस सायकलिंग पासून सुरू होतो. सकाळी योगासने व व्यायाम , अभ्यास वर्तमानपत्र वाचन,मधल्या काळात काँलेज वा घरीच अभ्यास संध्याकाळी सायकलींग वा स्टिक वर दोन अडीच  किमी चालणे , सायं प्रार्थना व अभ्यास गाणी म्हणणे ,   कथा वाचन,यूट्यूबवर प्रेरणादायी  व्हिडीओ बघणे , कविता वाचन  व 'शामच्या आई' 'ने  तो दहा - साडे दहा वाजता संपतो.वेळ द्यायला आम्ही अपूर्ण पडतो .

        दरम्यानच्या काळात ऋषिकेश ने एम.एस.सी.आय.टी. या संगणक परीक्षेत 89 गुण  मिळवले  .भूगोल सामान्य ज्ञान परीक्षा,  स्काँलरशिप परिक्षा यात विशेष प्राविण्य मिळवून प्रथम येउन शिष्यवृत्ती स पात्र ठरला.

ऋषिकेश ला प्रत्येक वर्षी नवीन अभ्यासक्रम मिळाला व नवीन शिकायला मिळाले. दहावी त तर त्याने यू ट्युब च्या माध्यमातून सर्व अभ्यास अनुभवला. पुस्तकातील स्टीफन हाँकिंग व पहिल्या एवरेस्ट सर करणाऱ्या दिव्यांग महिला अरूणिमा सिन्हा त्याच्याकरता आदर्श ठरले .त्यांचे अनुकरण करून त्यांनी रायगड किल्ला सर केला. विज्ञानातील स्टेमसेल थेरपी त्यांनी जानेवारी महिन्यात स्वतः अनुभवली, त्याचा त्याला फायदा झाला.

         सध्या त्याच्यावर "आखिल भारतीय पुनर्वसन एवं चिकित्सा संस्था हाजी अली - मुंबई येथे उपचार सुरु आहेत .तसेच बेळगाव ( कर्नाटक) व सेंदवा ( मध्यप्रदेश) येथे देखील आयुर्वेदिक उपचारासाठी ऋषिकेश ला आम्ही घेऊन गेलो होतो. उदयपूर येथील नारायण सेवा संस्था व आलाहाबाद येथील त्रिशला फाऊंडेशन येथील उपचार  आम्हाला काही कारणाने करता आले नाहीत .भविष्यात ते देखील होतील ...

आता तो बारावी विज्ञान शाखेत आहे. अभ्यास  online जोरात चालू आहेच , पण वयाप्रमाणे" विषय"ही  वाढले आहेत .तो आता " अठरा"वर्षाचा झालाय. नित्यक्रिया करताना थोडा जास्त वेळ लागतो एवढी अडचण सोडली तर सामान्य मुलाच्या तुलनेत कुठेच कमी असल्याचे समाधान वाटते.

       त्याला' किशोर' मासिक वाचणे .बातम्या वाचणे. बातम्या पाहणे .बातम्या ऐकणे, खुप आवडते भक्तिगीते, भावगीते म्हणायला  आवडत असल्यामुळे तो दरवर्षी शाळेच्या स्नेहसंमेलनात  व दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग मेळाव्यात आवर्जून सहभागी होतो. लाँक डाउन च्या काळात यमक जुळवून कविता रचणे  साहित्य क्षेत्रात व टिकटाँक चे व्हिडीओ 'डब ' करून अभिनय क्षेत्रात देखील आम्ही पाय ठेवून बघीतला . मागील वर्षी नाशिक येथील दोन महिन्यांतील वास्तव्यात श्री सोनकांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही सत्रात अथक मेहनत करून  ऋषिकेश साधारण पोहायला पण शिकला.

अशा ऋषिकेश मुळे आम्हाला ओळख मिळते आहे, मिळाली आहे, त्याचा  आम्हाला अभिमान आहे .

        मला विशेष मुलांच्या पालकांना सांगायचे आहे की खचून जाऊ नका ,संयमाने घ्या,  त्यांना पूर्ण वेळ द्या, अशा"विशेष " मुलांसाठी नियमित फिजोथेरपी

ची खूप गरज असते. त्यांची विशेष बाब शोधून काढा. त्यांच्या मनाचा ,बुद्धीचा आणि शरीराचा व्यायाम कधीही थांबवू नका. समाजाकडून मिळणार्‍या वाईट वागणूकी कडे  व प्रतिकूल परिस्थिती  कडे जास्त लक्ष देऊ नका.कोरड्या शुभेच्छांना लक्षात ठेवा.असहाय्य होउन सहाय्यतेची वाट पाहू नका . करणार आपणच आहोत हीच जणीव ठेवा .प्रसंगी लढा , प्रसंगी वेळ न घालवता  वाट बदला ,pont of focus' एकच'  ठेवा.आपले मूल " लाखात एक "हे 'लक्षात'आणून द्या . आमची " one and only - Rushikesh "  कडे बघून च वाटचाल चालू आहे तुमची पण तशीच ठेवा . आपण शून्या च्या पलीकडून ऋणातून वाटचाल करतोय ...शून्य आपल्या मागे असणार आहे ....पुढे नाही...आपल्या "प्रयत्नांना ---थेरपी ला " यश नक्की मिळणारच.....


Previous Post Next Post