पालक व शिक्षकांसाठी | मुले कशी शिकतात? बालकांची अध्ययन प्रक्रिया | Children's learning process

मुले कशी शिकतात? अध्ययन प्रक्रिया


बालकांची अध्ययन प्रक्रिया  learning process

आपण कसे शिकलो?


आईच्या गर्भात असल्यापासून अध्ययन प्रक्रिया सुरु होते. आपल्याला माहितच आहे. कि आईच्या गर्भात असल्यापासून  मुलाची अध्ययन प्रक्रिया सुरुवात होते. जन्मापूर्वी मुल  हालचाल करत असते. आईला त्याची जाणीव होते. आजूबाजूला मोठा आवाज झाला तर ही हालचाल वेग घेते. म्हणजे काय तर मुलाला काहीतरी संवेदना मिळत असतात.

जरा आपण आपल्या बालवयात जाऊन आठवूया कसे होते आपले ते बालपणातील दिवस? जास्तीत जास्त आपण किती लहान असतानाचा काळ आपल्याला आठवतो? मला तर या क्षणाला मी २ री, ३री त असतानाचे दिवस आठवतात. हे आठवत असताना आपल्या समोर त्यावेळची प्रतिमा चित्र येते.

आता आपल्या आजूबाजूच्या किंवा घरातील छोटे मुल दैनंदिन जीवनातील गोष्टी कसे शिकत आहे? आई,बाबा,मामा हे शब्द बोलायला कसे शिकत आहे? अर्थातच ऐकून , नक्कल करून, tv मोबाईल वरील व्हिडिओ पाहून आणि हे घडत असताना कशाद्वारे या गोष्टीचे आकलन होत आहे? अगदी बरोबर कानाद्वारे ऐकून , डोळ्याद्वारे बघून ,स्पर्शाची अनुभूती घेऊन म्हणजे थोडक्यात काय तर आपले पंचज्ञानेद्रीये द्वारे मुले शिकत आहे. म्हणजेच अध्ययन घडत आहे.

अध्ययन होणे किंवा शिकणे हे आपण कधी म्हणतो? कि माझा मुलगा किंवा माझा विद्यार्थी आता बोलायला लागला. किंवा वाचायला , लिहायला शिकला. असे आपण कधी म्हणतो? अर्थातच ज्यावेळी त्याच्या वर्तनात जो बदल होतो. म्हणजे वाचन, लेखन असेल याव्यतिरिक्त सायकल चालवणे, एखादा प्रसंग आठवून सांगणे, मोठ्यांना नमस्कार , अभिवादन करणे, लहान – मोठे यातील फरक समजणे अशा अनेक गोष्टी दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षणाला मुले शिकत असतात. आणि हे शिकलेलं किंवा अध्ययन केलेलं त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून ,प्रतिक्रियातून ते व्यक्त होत असते. म्हणजे त्यांच्या वर्तनात बदल होत असतो. यालाच अध्ययन म्हणता येईल. आपणही आजपर्यत ज्या ज्या गोष्टी आत्मसात केल्या त्याचा आपण दैनंदिन जीवनामध्ये योग्य ठिकाणी उपयोग करतो. म्हणजे समाजात किंवा कुटुंबात तसे वर्तन बदल आपोआप घडते.

 आपल्या सभोवतालची परिस्थिती सतत बदलत असते. आपण त्याच्याशी जुळवून घेण्याचा सतत प्रयत्न करीत असतो. अध्ययन प्रक्रियेत आपली ज्ञानेद्रीये फार मोठे भूमिका बजावत असतात. वर्तनात टिकाऊ स्वरूपाचे बदल म्हणजे अध्ययन होय.

⇛ अध्ययनाची व्याख्या व अर्थ/महत्व 


अध्ययनाचा परिणाम आपल्या प्रत्येक कृतीवर तसेच विचारांवर होत असतो. आपल्या अस्तित्वापासून अध्ययन वेगळे करताच येत नाही.सायकल चालवायला शिकणे, वाहन चालवायला शिकणे, बोलीभाषा शिकणे, घरातील कामे करायला शिकणे अशी लहान- मोठी सर्व कौशल्य आत्मसात करावीच लागतात. ज्याप्रमाणे अन्न , वस्र, निवारा ह्या मानवाच्या तीन मुलभूत गरजा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी काही कौशल्य, ज्ञान अवगत करावी लागतात. काही ज्ञान, कौशल्य आपोआप आत्मसात होते. तर काही मुद्दामहून शिकावे लागते. व त्यासाठी अध्ययन आवश्यक असते.

अध्ययन म्हणजे काय ? What is learning?

  •     अध्ययन म्हणजे वर्तनबदल 
  •     अध्ययन म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीला अनुसुरून व्यक्तीने स्वतःच्या वर्तनात केलेले कायमस्वरूपी बदल.
  •      जेव्हा वर्तनबदल टिकाऊ स्वरूपाचे असतात, तेव्हाच ‘अध्ययन’ झाले असे म्हणता येईल.


अध्ययनाची प्रक्रिया ?

ज्ञान, कौशल्ये आत्मसात करण्याची प्रक्रिया म्हणजे अध्ययन प्रक्रिया

  • अध्ययन ही  ध्येयापर्यंत जाणारी प्रक्रिया आहे. अध्ययन व्यवस्थित व पद्धतशीरपणे होण्यासाठी उद्दिष्टये आवश्यक असतात. 
  • उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रेरणा आवश्यक असते. 
  • नवीन कौशल्य आत्मसात करताना समायोजन होणे गरजेचे असते. 
  • कौशल्याची उजळणी करावी लागते.
  • अध्ययन ही  सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. 
  • अध्ययन होण्यासाठी सराव  होणे व अनुभव घेणे आवश्यक आहे. ⇛ अध्ययन कसे घडते?

आपल्याला ज्ञातच आहे की , आपण सर्वजण पंचज्ञानेंद्रिये मार्फत ज्ञान आत्मसात करत असतो. म्हणजे शिकत असतो. तरीदेखील काही मुलं ज्ञान,कौशल्यात मागे-पुढे असतात. कारण प्रत्येकाची आवड , क्षमता ,अभिरुची वेगवेगळी पहायला मिळते. म्हणजे जसे मुलाला वातावरण , योग्य सपोर्ट मिळत जाईल तसे ते घडत जाते. आता आपण हे अध्ययन कसे घडते. हे पाहूया. 

 अध्ययन प्रक्रिया घडताना SAPISC  या प्रक्रियेतून आपले अध्ययन होत असते. 

SAPISC

 १. Sensation  संवेदना 
 २.  Attention लक्ष  
 ३. Presaption आकलन 
 ३. Imagination प्रतिमा 
 ४. Symbolisation  प्रतिकीकरण 
 ५.  Conceptualization संकल्पना 


 १. Sensation  संवेदना अध्ययन हे  उपरोक्त  सांगितल्यानुसार पंचज्ञानेंद्रिये द्वारे आपण शिकत असतो. पंचज्ञानेंद्रियेचा  उपयोग आपण जसे- कान-ऐकणे, डोळे-पाहणे,   त्वचा-स्पर्श जाणीव, नाक- गंध घेणे, जीभ- चव समजणे. इ . या ५ संवेदना नुसार आपले अध्ययन घडते.

संवेदनांचे ज्ञान होणे न होणे हे आपल्या हातात नसते.  आपल्याला ती जाणीव होत असते.
उदाहरणार्थ - उसाच्या मळीचा वास येणे, न येणे, पोळी भाजल्याचा वास येणे न येणे इत्यादी

 संवेदनामुळे आपण येणाऱ्या अनुभवांमधील फरकही जाणतो.  उदाहरणार्थ वास चाफ्याच्या फुलांचा आहे की, मोगर्‍याच्या फुलाचा आहे हे आपण ओळखू शकतो

संवेदनाला अर्थ प्राप्त झाला की त्याला अवबोध म्हणतात.  ज्ञान ग्रहणाची पहिली पायरी म्हणजे संवेदना आणि दुसरी पायरी म्हणजे अवबोध होय. 


'संवेदना' आपोआप होतात म्हणजे आपण निष्क्रिय असतो पण अवबोध होताना मात्र आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करतो म्हणजे आपण सक्रिय असतो आपण त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असतो.  ज्या मानसिक प्रक्रियेने संवेदना द्वारे वस्तू किंवा परिस्थिती यांचे आकलन होते त्याला 'अवबोध'  म्हणतात.
संवेदना आणि अवबोध  यातील सीमारेषा सांगणे खूप कठीण आहे कारण संवेदना होतात आपण त्याचा अर्थही लगेच शोधतो.  उदाहरणार्थ- घंटेचा आवाज झाला की लगेच आवाज ऐकून हि देवळाची घंटा आहे की शाळेची सुटल्याची घंटा आहे हे आपल्याला समजते.
आपण जशी बाह्य संवेदनाची माहिती घेतली त्याचप्रमाणे काही अंतरिक संवेदनाही असतात.
उदाहरणार्थ- झोप येणे, भूक लागणे इत्यादी


अध्ययन सुरु होण्याची किंवा घडण्याची संवेदना ही  पहिली पायरी आहे. संवेदना पंचज्ञानेंद्रिये  मार्फत संदेश मेंदूपर्यंत जातो. तेथे मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया घडते. आपल्याला बोध होतो. जसे- गुलाबाचा सुगंध,चहाचा स्वाद, बासरीचा , मोबाईल चा आवाज याची साठवण मेंदूत होत असते.

आपण असे काही व्यक्ती/मुले पाहिली असतील. की  ज्यांना डोळे नाहीत म्हणजे त्यांना डोळ्याची संवेदना नाही. कान  आहे परंतु कानाने ऐकायला येत नाही. म्हणजे अशा वेळी त्यांना उर्वरित ज्ञानेंद्रियांचा जास्तीत जास्त वापर करून अध्ययन-अध्यापन करावे लागते. उदा. कर्णबधिर व्यक्ती/मुलं  डोळ्याने व इतर उर्वरित सवेंदनाचा वापर करून अध्ययन करतील. तर अंध विद्यार्थी कानाने ऐकून, स्पर्शाची अनुभूती घेऊन शिकेल. म्हणजे ५ संवेदना पैकी  काही संवेदना जरी काही बालकांना नसेल तरी देखील ते बालक  इतर संवेदना चा वापर करून शिकेल. त्यासाठी अध्ययन शैली समजून घ्यावी लागेल.

अध्ययन शैली व प्रकार 


२.  Attention लक्ष  

संवेदना मिळाल्यानंतर जेव्हा त्या सवेंदनाला अर्थ प्राप्त झाला की, आपण त्याकडे लक्षपूर्वक , जाणीवपूर्वक आपले लक्ष असते. उदा. टाळीचा आवाज कि घंटीचा आवाज यापैकी जेव्हा आपल्याला समजते कि हा टाळ्यांचा आवाज आहे म्हणजे आपले लक्ष त्या टाळ्यांच्या आवाजाकडे जाते. 
लहान मूल  रडत असेल तेव्हा आपण लगेच त्याला मोबाईल काढून गाणी दाखवतो आणि मूल  रडायचं थांबत म्हणजे त्याचे मोबाईल मुळे  लक्ष वेधून घेतले. जेव्हा आपण त्याला बोललो बाळा रडू नको, हे बघ हे काय आहे. बघ बघ म्हणजे यादरम्यान ते मूल  कानाद्वारे आणि डोळ्याद्वारे ऐकत  व पाहत त्याला संवेदना मिळत जाते. आणि जेव्हा मोबाईल हातात दिला जातो तेव्हा अपॊपाप मुलाचे रडणे थांबते. म्हणजे आता मुल  जाणीवपूर्वक त्या मोबाईल मध्ये बघत आहे. 

अध्ययन घडताना देखील याच पद्धतीने प्रत्येक ठिकाणी आपले लक्ष वेधून घेतले जाते. किंवा कधी कधी हि प्रक्रिया आपोआप घडत असते. 


३. Presaption आकलन 


    संवेदना मिळाल्यावर आपोआप आपले लक्ष त्याकडे वेधले जाते. आणि मग जाणीवपूर्वक ती माहिती मेंदूमध्ये साठवून त्यावर प्रक्रिया सुरु होते. यावेळी पूर्वंनुभवाचा याठिकाणी मनामध्ये सहसंबंध लावला जातो. जसे की, सायकल चालवायला शिकत असताना यापूर्वी आपण पाहिलेले चायकल चालवताना व्यक्तींना किंवा TV, मोबाईल मध्ये पाहिलेल्या व्हिडिओ आठवत असतात. उपरोक्त उदा. मध्ये आपण लहान बाळाचे रडणे मोबाईल मुळे  थांबले त्याठिकाणी त्याचे लक्ष त्या गाण्यामध्ये लागले. म्हणजे त्याकडे बघून त्याचे आकलन सुरु झाले.


आपण मुलांना पेन दाखवून विचारले कि हा काय आहे? तर मुले पटापट उत्तरे देतील पण जेव्हा आपण त्यांना असे विचारू की  पेनाचा उपयोग कोठे होतो? किती प्रकारचे पेन तुम्ही पहिले तेव्हा विचार प्रक्रिया विस्तारते. म्हणजे आकलनास या पायरीमध्ये सुरुवात होते. जेव्हा आपण किंवा आपल्याला संबंधित गोष्टीचे अध्ययन घडते तेव्हा या पायरीमध्ये आकलन होत असते.

 ३. Imagination प्रतिमा 


अध्ययन प्रक्रियेतील पुढची पायरी म्हणजे IMAGINATION  कल्पना विस्तार किंवा प्रतिमा आठवणे. उदा. भूक लागली तर त्यात आपल्याला खाद्यपदार्थ दिसतील. त्याचबरोबर नवीन गोष्टीचे अध्ययन घडताना प्रत्येक ठिकाणी पूर्वज्ञानांचा संबंध लागत जातो. जसे की , एखादी वस्तू पाहतो तेव्हा आपल्याला त्या वस्तूची जागा किंवा पार्श्वभूमी दिसत असते. उदा. माईक चा वापर कोठे करतात? तर नक्कीच आपल्या समोर मोठे सभारंभ , कार्यक्रम डोळ्यासमोर येतील.

आपण जे अध्ययन करतो ते प्रतिमेच्या स्वरूपात साठवत असतो. म्हणजे जेव्हा आपण लहान मुलांना वाचायला शिकवतो. उदा. अ - अननस ,क- कमळ  त्याचे चित्र दाखवतो म्हणजे मूल  याठिकाणी कमळाचे चित्र प्रतिमा स्वरूपात साठवून ठेवत असते. जेव्हा आपण मुलांना कमळ  हा शब्द वाचायला सांगतो तेव्हा अजूनपर्यंत त्याला वाचता येत नाही. परंतु जेव्हा चित्र समोर ठेवतो तेव्हा त्याला लगेच स्मरण होते. हे कमळ  आहे. म्हणजे त्यांना प्रतिमा स्वरूपात ते साठवून ठेवलेले असते.

जेव्हा आपण एखाद्या नवीन ठिकाणी प्रवास करतो तेव्हा पहिल्यांदा त्याचे प्रतिमा स्वरूपात साठवले जाते. नंतर दुसऱ्या वेळेला जे आपण प्रतिमा स्वरूपात साठवलेले असते. त्यानुसार आपल्याला रस्ता आठवत जातो. म्हणजे आपले अध्ययन घडते. या पायरीमध्ये प्रतिमा स्वरूप साठवले जाते.


 ४. Symbolisation  प्रतिकीकरण अध्ययन प्रक्रियेतील पुढची पायरी म्हणजे symbolisation  त्यालाच प्रतिकीकरण म्हणजे  विशिष्ट symbol स्वरूपात अध्ययन घडणे.  तुम्हाला पुढे दिलेला उर्दू भाषेतील  शब्द  वाचायचा आहे. कदाचित तुम्हाला उर्दू भाषा येत असेल तर तुम्हाला वाचता येईल परंतु  उर्दू भाषेतील symbol  आपल्याला वाचता येत नाही म्हणजे आपले अध्ययन उर्दु  भाषेत झालेली नाही. उदा.  مطالعہ इथे काय शब्द लिहला असेल. ? आपल्याला तो अपरिचित वाटू शकेल . तुम्हाला अध्ययन हा शब्द वाचायला सांगितला तर चटकन तुम्ही वाचाल म्हणजे आपले मराठी भाषेतील अध्ययन झाले आहे म्हणून म्हणजे आपण मराठी वाचन लेखन कौशल्य अवगत केलेले आहेत.

आता तुम्ही हे वाचत आहात  म्हणजे या शब्दाचे मराठी बाराखडी , अक्षरे यांचे symbolisation  झालेले आहे. याउलट उदा.  मुलांना आपण उर्दू भाषेत गुलाब हा शब्द वाचायला दिल्यास त्यांना ते अपिरिचित वाटेल परंतु  मुलांसमोर आपण गुलाबाच्या फुलाचे चित्र दाखवले तर ते पटकन प्रतिक्रिया देतील की  हे गुलाबाचे चित्र आहे.  आणि मग आपण मुलांना शब्द स्वरूपात लिहून वाचायला शिकवले तर ते symbol  स्वरूपात लक्षात ठेवतात. आणि हि सवय आपोआप अंगवळणी पडून जाते.  एकंदरीत काय तर अध्ययन होत असताना symbolisation देखील होत असते.


५.  Conceptualization संकल्पना 

अध्ययनातील शेवटची पायरी म्हणजे conceptualization  संकल्पना दृढीकरण होणे. म्हणजेच संकल्पना / संबोध निर्मिती अध्ययन असे म्हणता येईल. जेव्हा संबोध स्पष्ट होतात तेव्हा ते वर्तनातून दिसून येतात.
उदा. मुलांना बेरीज अध्ययन होण्यासाठी  उपरोक्त पायऱ्यानुसार बेरीजेचे अध्ययन होताना संवेदना, लक्ष वेधून , पूर्वंनुभवाशी संबंध लावत  conceptualization  संकल्पना दृढीकरण होते. आणि मग दैनंदिन जीवनामध्ये बाजारातून सामान आणताना किती पैसे द्यायचे? परत  किती घ्यायचे हे त्यांच्या वर्तनातून दिसून येते. म्हणजे अध्ययन झाले असे म्हणता येईल आणि हे अध्ययन टिकाऊ स्वरूपाचे अध्ययन असेल.


सारांश

बालकांची अध्ययन प्रक्रिया कशी असते? किंवा आपण कसे शिकलो ? अध्ययनाची व्याख्या , अर्थ, महत्व  याबद्दल माहिती बघितली.  व्यक्ती नवीन ज्ञान किंवा कौशल्य शिकते तेव्हा त्याच्यामध्ये बदल होत असतात. मुलांचे संबोध/संकल्पना स्पष्ट होण्यासाठी मुलांची क्षमता , आवड लक्षात घेणे आवश्यक असते. जेणेकरून नवीन कौशल्य शिकण्यासाठी लक्ष टिकून राहील. आणि मूल  पूर्वानुभवाशी सांगड घालून अध्ययन घडेल. यासाठी आपण काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक वाटते.

१. अध्ययनकर्त्याची मानसिक, शारीरिक स्तिथी

२. अध्ययनकर्त्याची क्षमता, आवड

३. अध्ययनकर्त्याचे  पूर्वंनुभव

४. जास्तीत जास्त ज्ञानेंद्रियांचा वापर

५. विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग मुलांच्या बाबतीत त्यांच्याकडे असलेल्या उर्वरित ज्ञानेंद्रियांचा जास्तीत जास्त वापर व आवश्यकतेनुसार अनुकूलन adaption

६. अध्ययन शैलीनिहाय अध्ययन - अध्यापन पद्धती 

७. अध्ययन टिकाऊ स्वरूपाचे होण्यासाठी उजळणी व सराव

८. प्रेम, आपुलकी, आत्मसन्मान  मिळेल यासाठी मुलांना प्रोत्साहन, प्रेरणा तंत्राचा वापर

९. मुलांना संधी-सराव-सातत्य-प्रगती  हे तंत्र अवलंब केल्यास नक्कीच मुलांचे अध्ययन टिकाऊ स्वरूपाचे होतील व त्याचा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग होईल.

 
अध्ययन प्रक्रियेच्या संबंधी याआधीचे लेख वाचा

समता : का? व कशी? Equity: Why? And how?
> समता ते वाचन क्षमता Equity to reading ability 
>  अध्ययन शैली व प्रकार Previous Post Next Post