डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती | Dr.Babasaheb Ambedkar Yanchi Mahiti

Dr.Babasaheb Ambedkar Yanchi Mahiti : दिनांक 14 एप्रिल हा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb  Ambedkar) यांचा जन्मदिवस 'आंबेडकर जयंती' म्हणून साजरा केला जातो. दलितांसाठी दैवत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन, कार्य, विचार पुढील पीढीसाठी सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. या निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या कार्याविषयीची माहिती घेऊया.

Dr.babasaheb ambedkar


{tocify} $title={Table of Contents}

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती | Dr.Babasaheb Ambedkar Yanchi Mahiti

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण 

डॉ. बाबासाहेबांचे वडील रामजी सपकाळ यांनी पुण्यात आपले शिक्षण पूर्ण केले. पंतोजी शाळेमध्ये ते होते. त्यांनी आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लष्करामध्ये शिक्षक म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली. नंतर शाळेत ते प्रधान शिक्षक झाले. त्यानंतर त्यांना मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळाली. 

14 वर्षे मुख्याध्यापकांचे काम सांभाळल्याने त्यांना सैन्यात मेजर (सुभेदार) म्हणून बढती मिळाली. नंतर ते महू येथे नोकरी निमित्त वास्तव्यास होते. कारण महूला मिलिटरी हेडकॉर्टर्स ऑफ वॉर म्हणून ओळखले जाई. तेथेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला.

भिमाबाई यांच्या पोटी जन्म घेणारे डॉ. बाबासाहेब हे 14 वे अपत्य होते. भिमाबाई यांचे पुढे बाबासाहेबांच्या बालपणीच निधन झाले. (भिमाबाई यांची समाधी सातारा येथे आहे.) बाबासाहेबांचे नाव 'भीम' असे ठेवण्यात आले.

नंतर 'भीम' यांचे भीमराव त्यांचे पूर्ण नाव डॉ.भीमराव रामजी आंबेडकर आणि यांना नंतर लोक आपले बाबा संबोधू लागले आणि नंतर ते सर्वांचे 'बाबासाहेब' झाले.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नावडॉ.भीमराव रामजी आंबेडकर आहे.  या भिमाचा सांभाळ डॉ. आंबेडकरांची आत्या मीराबाईंनी केला. हा भीम बुद्धिवान व्हावा, त्याने दीनदलित समाजाचा उद्धार करावा. अशी पिता रामजी सुभेदार यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी लहानपणीच बाळ 'भीम' यांच्यावर पाच मुल्यसंस्कार रुजवले होते.

1) शिक्षण 
2) शिस्त 
3) स्वावलंबन 
4) स्वाभिमान 
5) कठोर परिश्रम.  

या मूल्यांचा बाबासाहेबांनी आपल्या जीवनात अंगीकार केला आणि त्यानुसार वाटचाल केली आणि पुढे हा 'भिम' या देशातील दीनदलितांचा उद्धारकर्ता, भारतीय राज्यघटनेचा निर्माता ठरला. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाला म्हणजेच 'महु' ला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. महू इथे लाखो पर्यटक दरवर्षी भेट देऊन बाबासाहेबांच्या जन्मस्थळाला वंदन करीत असतात. 

महू येथे बाबासाहेबांच्या जन्मस्थळावर शासनाने यथोचित स्मारक उभे केले आहे हे स्मारक एक चैतन्याचा झरा आहे. (मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथून दोन ते तीन तासाच्या अंतरावर व इंदौर येथून 20 किलोमीटरच्या अंतरावर महू आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील 'आंबडवे' वे हे त्यांचे मूळ गाव. अतिशय कमी लोकसंख्येचे , बाबासाहेबांच्या पूर्वजांचे आंबडवे गाव. डॉ.आंबेडकर आडनावाची कहाणी मोठी रंजक आहे. 'आंबडवे'  गावात सपकाळ कुटुंबीय राहते. बाबासाहेबांचे आडनाव सपकाळ. नंतर त्यांच्या वडिलांनी बाबासाहेबांचे आडनाव सातारा येथील प्रतापसिंह शाळेत आंबाडवेकर असे 7 नोव्हेंबर 1900 रोजी नोंदविले. 

आजही 7 नोव्हेंबर हा शाळा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 'शाळा प्रवेश दिन' म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेबांचे नाव नोंदवलेले रजिस्टर आणि त्यांची स्वाक्षरी पहावयास या शाळेमध्ये मिळते. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण सातारा येथेच गेले.

 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण

बाबासाहेबांच्या वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईत स्थलांतर केले होते. बाबासाहेब 1907 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कॉलेजचे शिक्षण मुंबईच्या 'एल्फिस्टन' मध्ये झाले, तिथे 1912 मध्ये  बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे परदेशातील शिक्षण हे बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी बाबासाहेबांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य केले. 1913 मध्ये ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे श्रेष्ठ ज्ञानयोगी होते. ते प्रकांड पंडित होते त्यांची विद्वत्ता अद्वितीय अशी होती. मात्र यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. परदेशात जाऊन अत्यंत कठीण परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेतले. 

परदेशातील शिक्षणासाठी त्यांनी जे कष्ट घेतले त्याला तोड नाही. दररोज अठरा-अठरा तास याप्रमाणे काही महिने त्यांनी सलग सतत अभ्यास केला. शिक्षणामुळेच प्रगतीच्या आणि विकासाच्या विविध संधी प्राप्त होतात. हे त्यांनी आपल्या उदाहरणावरून सिद्ध केले. या ज्ञानयोग्याने विविध विषयांचे ज्ञान मिळण्यासाठी जे अथक परिश्रम घेतले ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. 

अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी विषयांचे अध्ययन केले.  1915 मध्ये त्यांनी 'प्राचीन भारतातील व्यापार' या विषयावर प्रबंध लिहून कोलंबिया विद्यापीठाची एम.ए. ची पदवी संपादन केली. त्यांच्या 'नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया: ए हिस्टॉरिकल ऍनालीटिकल स्टडी' या प्रबधाबद्दल कोलंबिया विद्यापीठाने त्यांना पीएच.डी. ही पदवी प्रदान केली.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य

मूकनायक

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मूकनायक या पाक्षिक मधील कार्य पुढीलप्रमाणे

अमेरिकेतील अभ्यासक्रम पूर्ण करून आंबेडकर कायदाअर्थशास्त्र या विषयांच्या अभ्यासासाठी इंग्लंडला गेले. परंतु आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावे लागले. काही काळ त्यांनी बडोदा संस्थानात नोकरी केली. 

पुढे मुंबईच्या 'सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स' मध्ये प्राध्यापक म्हणून ते काम करू लागले. याच सुमारास त्यांनी सार्वजनिक कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. 31 जानेवारी 1920 रोजी त्यांनी 'मूकनायक' हे पाक्षिक सुरु केले माणगावनागपूर येथे भरलेल्या अस्पृश्यता निवारण परिषदांमध्ये त्यांनी भाग घेतला होता.

बॅरिस्टर होऊन भारतात परत

1920 मध्ये बाबासाहेब पुन्हा इंग्लंडला गेले तिथे प्रथम त्यांनी बी.एस्सी. पदवी संपादन केली. 'दि प्रॉब्लेम ऑफ रुपी' या त्यांच्या प्रबंधाबद्दल त्यांना डी.एस्सी. ही पदवी मिळाली. याच वास्तव्यात ते 'बार-ऍट-लॉ' परीक्षा उत्तीर्ण झाले. 1923 मध्ये ते भारतामध्ये परतले.

बहिष्कृत हितकारणी सभा

भारतात परतल्यावर बाबासाहेबांनी आपल्या सार्वजनिक कार्याला जोमाने सुरुवात केली. 1924 मध्ये त्यांनी 'बहिष्कृत हितकारिणी सभा' या संस्थेची स्थापना केली. 1927 मध्ये त्यांची मुंबई कायदे मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली. अशाप्रकारे त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली.

अस्पृश्यांच्या हक्कासाठी संघर्ष

डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी केलेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या अस्पृश्य बांधवांना अन्यायाचा प्रतिकार करण्यास आणि न्याय हक्कासाठी संघर्ष करण्यास शिकवले. अस्पृश्य हे या देशाचे नागरिक असून या देशावर इतर कोणाही इतकाच त्यांचाही अधिकार आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

'बहिष्कृत भारत' पाक्षिक

अस्पृश्य बांधवावर शतकानुशतके होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बाबासाहेबांनी 3 एप्रिल 1927 रोजी 'बहिष्कृत भारत' हे पाक्षिक सुरु केले. ते 15 नोव्हेंबर 1929 पर्यंत हे पाक्षिक चालू होते. 

अस्पृश्यतेतून निर्माण होणारे दुःख त्यांनी स्वतःच अनुभवले असल्याने त्यांनी अस्पृश्यांचे हक्क प्रस्थापित करण्याच्या प्रश्नाला सर्वाधिक महत्त्व दिले.

चवदार तळ्याचा सत्याग्रह

महाड या गावातील तळ्याचे पाणी भरण्यास अस्पृश्यांना मज्जाव होता. तेथील नगरपालिकेने एक ठराव करून हे तळे अस्पृश्यांसाठी खुले केले होते. परंतु सवर्ण हिंदुंच्या भीतीमुळे अस्पृश्य बांधव तेथे जाऊ शकत नव्हती. 20 मार्च 1927 रोजी आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह  करून त्या तळ्याच्या पाण्यावर अस्पृश्यांचा ही हक्क आहे. याची सर्वांना जाणीव करून दिली.

मनुस्मृतीचे दहन

' मनुस्मृती ' या हिंदू धर्मग्रंथाने जन्माधिष्ठित वर्णव्यवस्थेचे समर्थन करून पर्यायाने सामाजिक विषमतेला व त्यावर आधारित जातिव्यवस्थेला आधार प्राप्त करून दिला होता. सामाजिक विषमता आणि उच्च-नीच भेदभाव यांचे समर्थन करणाऱ्या या ग्रंथाचा प्रतिकात्मक निषेध करण्यासाठी बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचे जाहीर रित्या दहन केले.

मंदिरप्रवेशासाठी सत्याग्रह

हिंदू धर्मातील उच्चवर्णीयांनी अस्पृश्यांना मंदिर प्रवेशाचा हक्कही नाकारला होता. आंबेडकरांनी याबाबत असे म्हटले होते की, 'हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे तितकीच ती अस्पृश्यांची आहे'. म्हणून मंदिरप्रवेशाचा आमचा हक्क मान्य झालाच पाहिजे. हा हक्क सिद्ध करण्यासाठी त्यांनी 3 मार्च 1930 रोजी नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला.

धर्मांतर

हिंदू धर्माने अस्पृश्यांना न्याय देवा याकरिता आंबेडकरांनी सर्व प्रकारचे प्रयत्न केले, तरी सवर्ण हिंदूंच्या वृत्तीत फारसा फरक पडला नाही. सहाजिकच सवर्ण हिंदू कडून अस्पृश्यांना कधीच न्याय मिळणार नाही. अशी त्यांची खात्री पटली. त्यातूनच त्यांनी धर्मांतराचा निर्णय घेतला त्यानुसार 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे आपल्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. धर्मांतरासाठी बौद्ध धर्माची निवड करण्यात देखील आंबेडकरांचे दूरदर्शीत्व व राष्ट्रहीताची  तळमळ यांचे आपणास दर्शन घडते.

गोलमेज परिषदांना उपस्थिती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राजकारणातही अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. 1930 ते 1932 च्या दरम्यान इंग्लंड मध्ये भरलेल्या तीनही गोलमेज परिषदांना ते अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले होते. त्या ठिकाणी त्यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली 1932 मध्ये इंग्लंडचे पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी 'जातीय निवाडा' जाहीर करून ही मागणी मान्य केली.

पुणे करार

महात्मा गांधींचा अस्पृश्याना स्वतंत्र मतदार संघ देण्यास विरोध होता. स्वतंत्र मतदार संघामुळे अस्पृश्य समाज उर्वरित हिंदू समाजापासून दूर जाईल, असे त्यांना वाटत होते त्यामुळे जातीय निवाड्यातील या तरतुदीच्या विरोधात गांधीजींनी येरवडा तुरूंगात प्राणांतिक उपोषण आरंभले. 

तेव्हा गांधीजींचे प्राण वाचावेत म्हणून आंबेडकर तडजोडीस तयार झाले. त्यानुसार महात्मा गांधीआंबेडकर यांच्यामध्ये किंबहुना, काँग्रेस व दलित नेते यांच्यामध्ये येरवडा येथील तुरुंगातच 'येरवडा करार' किंवा 'पुणे करार' घडून आला. 

या करारावर डॉ. आंबेडकरांसह काही दलित नेत्यांनी व पं. मदनमोहन मालवीय, चक्रवर्ती राजगोपालचारी, डॉ. राजेंद्र प्रसाद यांसारख्या काँग्रेस नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. या करारान्वये आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाचा आग्रह सोडला व अस्पृश्यांसाठी राखीव जागा असाव्यात , असे उभयपक्षी मान्य करण्यात आले.

स्वतंत्र मजूर पक्ष 

1936 मध्ये बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. पुढे 1942 मध्ये त्यांनी 'शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन' हा पक्ष स्थापन केला या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्यांच्या हितरक्षणासाठी अविरत प्रयत्न केले.

भारतीय घटनेचे शिल्पकार

 डॉ. आंबेडकर भारताच्या घटना समितीचे सभासद होते. घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. भारतीय राज्यघटना तयार करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण वाटा उचलला होता. म्हणूनच 'भारतीय घटनेचे शिल्पकार' या शब्दांत त्यांचा गौरव केला जातो.

आंबेडकर भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात काही काळ मजूरमंत्री होते. केंद्र सरकारातील कायदामंत्री या नात्याने त्यांनी परिश्रमपूर्वक 'हिंदू कोड बिल' तयार केले होते. परंतु या बिलाला विरोध झाल्याने त्यांनी मंत्रिपदाचा त्याग केला.

स्वातंत्र्योत्तर काळात सर्व पददलित वर्गांचे प्रतिनिधित्व करणारा , व्यापक पायावर आधारलेला भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याची त्यांची योजना होती. तथापि , या योजनेला मूर्त स्वरूप येण्यापूर्वीच त्यांचा अंत झाला. पुढे त्यांच्या अनुयायांनी 'रिपब्लिकन पक्षा' ची स्थापना केली.

शैक्षणिक कार्य

अस्पृश्यांना शिक्षण मिळाल्याखेरीज त्यांची उन्नती होऊ शकणार नाही, हे बाबासाहेबांनी ओळखले होते. यास्तव त्यांनी शिक्षण प्रसाराच्या कार्यावर ही भर दिला होता. त्यांनी स्थापन केलेल्या 'बहिष्कृत हितकारिणी सभा' या संस्थेमार्फत दलित समाजातील तरुण व प्रौढ व्यक्तींसाठी रात्र शाळा चालविणे, वाचनालय सुरु करणे यासारखे उपक्रम हाती घेण्यात आले होते.

1946 मध्ये त्यांनी 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी' ही संस्था स्थापन केली. ती च्या वतीने मुंबईला 'सिद्धार्थ कॉलेज', औरंगाबादला 'मिलिंद कॉलेज'ही महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्था सुरू केल्या. दलित विद्यार्थ्यांसाठी ही अनेक वस्तीगृह चालवली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुस्तके / ग्रंथसंपदा

हु वेअर दी शूद्राज? बुद्ध अँड हिज धम्म , दी अनटचेबल्स, दी प्रॉब्लेम ऑफ रुपी (अर्थ शास्र विषयक प्रबंध) , रिडल्स इन हिंदुझम , थॉट्स ऑन पाकिस्तान, महाराष्ट्र ॲज अ लिंग्विस्टिक स्टेट , स्टेटस अँड मायनॉरिटीज

दलितांमधील अस्मिता जागविली

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील दलित समाजाच्या उद्धारासाठी जे कार्य केले त्याला इतिहासात तोड नाही. आपल्या अस्पृश्य बांधवांना संघटित करून त्यांना अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यास व न्याय हक्कांसाठी झगडण्यास त्यांनी तयार केले. 

अशा प्रकारे त्यांनी दलितांमधील अस्मिता जागृत केली. त्याचबरोबर दलितांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहाशी जोडून आणि भारताची राज्यघटना तयार करून त्यांनी या देशाची ही फार मोठी सेवा केली आहे.

राष्ट्रसेवेप्रति कृतज्ञता

बाबासाहेबांच्या या महान राष्ट्रसेवीप्रती कृतज्ञता म्हणून बाबासाहेबांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा प्रारंभाचा योग साधून 14 एप्रिल 1990 रोजी त्यांना मरणोत्तर 'भारतरत्न' हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. बाबासाहेबांना हा सन्मान प्रदान करण्यात आल्यामुळे या सन्मानाचीही सर्वोच्चता सिद्ध झाली आहे. महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956

सारांश

डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar) यांनी जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन कार्याचे, विचारांचे चिंतन करुया.  जयंतीच्या निमित्ताने महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवाद सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Previous Post Next Post