सावित्रीबाई फुले निबंध मराठी | Savitribai Phule Nibandh Marathi

Savitribai Phule Nibandh Marathi : एकोणविसाव्या शतकाच्या मध्यार्थात ज्या वेळी भारतासारख्या रुढीवादी परंपरा असणा-या देशात स्त्रीला समाजात 'चूल आणि मूल एवढेच स्थान होते. महिलांना समाजात कोणताही दर्जा दिला जात नव्हता, अशा वेळी महिलांना शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा, नव संजीवनी देण्याचे काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. अशा या महान ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाचे द्वार खुले केले. सावित्रीबाई फुले या विषयावर आज आपण निबंध लिहिणार आहोत. आणि त्यांच्या संपूर्ण जीवनाविषयी चे लेखन आजच्या मराठी निबंध या लेखणात असणार आहे. या माहितीचा उपयोग आपण सावित्रीबाई फुले या विषयावर भाषण करण्यासाठी तसेच निबंध लेखन करण्यासाठी होणार आहे.

{tocify} $title={हायलाईट्स}

सावित्रीबाई फुले निबंध मराठी | Savitribai Phule Nibandh Marathi

Savitribai Phule Nibandh Marathi

सावित्रीबाई फुले यांचे बालपण ते शैक्षणिक कार्य

सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिनांक 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी झाला. सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील तर आईचे नाव लक्ष्मीबाई होते. वयाच्या नवव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचे लग्न महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाले. ज्योतीबा त्यावेळी तेरा वर्षाचे होते. 

एकदा ज्योतिबांनी सावित्रीबाईना विचारले तुम्ही शिकता का अक्षर ओळख सावित्रीबाई क्षणभर गप्प झाल्या नंतर त्यांनी विचारले, "पण ते कसं शक्य आहे? कोण शिकवणार मला?" त्यावेळी मुलींसाठी शिक्षणाची दारं बंदं होती. काही ख्रिस्ती मिशनऱ्यांनी स्त्रीशिक्षणाचा प्रयत्न केला होता. परंतु पुण्याच्या धर्ममार्तंडांनी तो हाणून पाडला होता. 

स्त्री शिकली तर ती बिघडेल. ती ज्ञानी झाली तर आपल्या आधिपत्याखाली राहणार नाही. आपली सेवा करून मुलाबाळांसाठी पै- पाहुण्यासाठी राब राब राबणार नाही. हे आपल्या उपभोगाचं साधन, तिला शिक्षणाने स्वतंत्र अस्तित्व मिळेल. मग आपले वर्चस्व झुगारण्यास ती मागेपुढे पाहणार नाही. त्यापेक्षा डांबा तिला अज्ञानाच्या तळघरात आणि वरून लावा भले मोठ्ठे धर्मशास्त्राचे कुलूप ! असेच इथल्या तथाकथित विद्वानांचे मत होते. 

या महात्म्याने त्याच क्षणी पत्नीला ठासून सांगितले, “सावित्री, तुम्ही नक्की शिका, मी शिकवितो तुम्हांला !" पण बोलण्याएवढे कृतीत आणणे साधे नव्हते. कारण त्या काळी दिवसा पत्नीशी बोलायची सुद्धा चोरी होती. तिथे पाटी-पुस्तक घेऊन बायकोला शिकवत बसणे शक्यच नव्हते. पण बोलून मागे हटणारे जोतिबा नव्हते.

भल्या पहाटे मळ्यात जाऊन काळ्या आईची सेवा करता करताच मातीवर रेघोट्या पाडून जोतिबा सावित्रीला “अ, आ, ई" शिकवत बसे, झाडाची पाने मोजून गणित शिकवित असे, मुळाक्षरे, बाराखडी सावित्री गिरवू लागली. साधारणतः १८४४ चा तो काळ होता. काळ्या आईची पाटी करून युगस्त्रीने लेखणी हाती धरली होती. ते तिचे सर्वात महत्त्वाचे हत्यार होते.

सावित्रीबाई फुले यांची संपूर्ण माहिती

पुण्यात शिक्षणाची सोय नव्हती म्हणून ज्योतिबांनी सन १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली.  या शाळेमध्ये मुलीना शिकवण्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची शिक्षिका म्हणून नेमणूक करण्यात आली. याच त्या भारतातील पहिली महिला शिक्षक सावित्रीबाई फुले पुढे त्यांनी मुख्याध्यापक म्हणून देखील काम पहिले आणि भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका देखील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याच होय.

मुलीना शिकवण्याचे काम करत असतांना त्यांचा मानसिक आणि काही प्रमाणात शारीरिक छळ नातेवाईकांनी, समाजाने, सनातन्यांनी केला. रस्त्यातून जात असतांना त्यांना लोकांकडून शिवीगाळ, स्रियांच्या अंगावर शेणाचे गोळे फेकण्यात आले. मुलीना शिक्षण दिले जात होते म्हणून सावित्रीबाई फुलेंना देखील त्या काळातील काही लोकांनी शेन व दगड मारले. घरातील कचरा त्यांच्या अंगावर टाकण्यात आला. पण हे सर्व त्यांना सत्काराची फुले उधळल्या सारखीच वाटत होती. हे सर्व कृत्य त्यांना विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठीचे प्रोत्साहन देत. 

त्यांच्या मुलींच्या शाळेत मुलींची संख्या हळूहळू वाढू लागली. पुण्यात त्या काळात हा चर्चेचा विषय झाला होता. या कार्यामुळे समाजात सावित्रीबाईंचा दरारा निर्माण झाला होता. सावित्रीबाई जवळ विलक्षण चिकाटी व कठोरपणा होता. 

एकदा शाळेत जात असतांना चौकातील गुंडांनी सावित्रीबाईचा रस्ता अडवून मुलींना आणि महार-मांगांना शिकवणे तू बंद कर नाहीतर तुझी अब्रू शाबूत राहणार नाही अशी धमकी दिली. हे ऐकताच सावित्रीबाईनी त्याला चपराक लगावली. सावित्रीबाई अशा संकटांना तोंड देण्यास समर्थ होत्या. दादोबा पांडुरंग तर्खडकर हे सरकारी-देशी शाळांचे परिक्षक असतांना त्यांनी थोड्याच काळात शाळेची चांगली प्रगती केली. हे भूषावह आहे असा शेरा दिला. 

संत चोखामेळा मंदिरात त्यांनी दिन-दलितांसाठी शाळा उभारली. त्यांच्या या कार्याबद्दल इंग्रज सरकारने त्यांचा गौरव केला. असा मान आत्तापर्यंत कोणालाही मिळाला नाही. सावित्रीबाईनी जे विचार मांडले ते त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणले.

सावित्रीबाई फुले यांची संपूर्ण माहिती

सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य

सावित्रीबाईनी मुलींच्या शिक्षणाचे कार्य करत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यात देखील त्यांनी सक्रीय सहभाग घेऊन सामाजिक कार्य केले. त्या काळात विधवा महिलांचे केशवपन होत असे. कारण विधवा स्त्री ने संन्यासिनी सारखे जीवन जगावे अशी रूढी परंपरा होती. सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधकगृह सुरु केले. बाल-विधवांचे दुखः त्यांनी जाणले होते. स्त्रीभ्रूण हत्याही सरांस घडत असे म्हणून बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केले. 

अस्पृश्यांसाठी जोतिबांनी सार्वजनिक पाण्याचे हौद खुले केले. १८९३ साली सत्यशोधक समाजाचे मोठे अधिवेशन सासवडला भरले होते. त्याच्या अध्यक्षा सावित्रीबाई फुले होत्या. त्यात त्यांनी आपले विचार परखडपणे मांडले. 

सावित्रीबाईंना स्वतःचे अपत्य नव्हते पण दिन-दलितांना व अनाथांना जवळ करून सावित्रीबाईंनी पोटच्या मुलांप्रमाणे प्रेम केले. सावित्रीबाईनी ज्योतिबांच्या कार्यात उत्तम साथ दिली. सर्व टीका, छळ सहन करून समाज सुधारण्याचे काम केले.  

बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ मुलांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्म घेतलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले आणि त्याचे नाव यशवंत असे ठेवले होते.

ज्योतीबा फुले व सावित्री बाईचे शिक्षणाचे पवित्र कार्य चालू असतांना, त्यांच्या ह्या कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न ज्योतीबारावांच्या वडिलांनी केला. त्यांच्या समाज सुधारण्याच्या कार्यामुळे धर्माला काळिमा लागेल, बेचाळीस पिढया नरकात जातील असे त्यांचे समज होते. पण सावित्रीबाई आपल्या कार्यापासून डगमगल्या नाही. 

सावित्रीबाई भारताची पहिली महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि मराठी कवीयत्री होती. सावित्रीबाईंच्या कवितासंग्रहाचे नाव काव्यफुले व बावनकशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह सावित्रीबाई फुले यांनी लिहिले आहे. विधवांचे पुनर्विवाह, अस्पृश्यता निर्मूलन, महिलांना शोषणातून मुक्त करणे तसेच दलित महिलांना शिक्षित करणे यासारखे महत्वाचे कार्ये सावित्रीबाई फुले यांनी केले.

पुण्यामध्ये प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला होता. एका प्लेग झालेल्या दलित मुलाला खांद्यावरून आपला मुलगा डॉक्टर यशवंत यांच्या दवाखान्यांमध्ये नेण्याचे कार्य करीत असतानाच सावित्रीबाईना प्लेगचा संसर्ग झाला त्यातच त्यांचा 10 मार्च 1897 रोजी पुणे येथे मृत्यू झाला. आणि त्यातच या क्रांतिकारक महिलेने जगाचा निरोप घेतला. मानवतेच्या या सेविकेचा अंतही मानवतेची सेवा करतानाच रणमैदानावरील एखाद्या रणमर्दानीस साजेसाच झाला. अशा या महान ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शतशः प्रणाम...

सावित्रीच्या लेकी आम्ही शिकून सवरून मोठ्या

होऊ, जे नाही जमले आजपर्यंत कोणाला तो

इतिहास घडवून जाऊ.

सावित्रीबाई फुले यांच्या विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न - महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा कधी सुरू केली?

उत्तर - सावित्रीबाईंनी पुण्यामध्ये 1 मे 1847 रोजी मागासांच्या वस्तीत पहिली  शाळा सुरु केली. मात्र काही दिवसात ही शाळा बंद पडली. नंतर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा 1 जानेवारी 1848 रोजी बुधवार पेठेतील भिडे वाड्यात सुरु केली.

प्रश्न - मुलींची पहिली शाळा कधी सुरू झाली?

उत्तर - मुलींची पहिली शाळा महात्मा फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडेवाडा येथे सुरु केली.

प्रश्न - सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा कधी सुरू केली?

उत्तर - सावित्रीबाईंनी पुण्यामध्ये 1 मे 1847 रोजी मागासांच्या वस्तीत पहिली  शाळा सुरु केली. मात्र काही दिवसात ही शाळा बंद पडली. 

प्रश्न - सावित्रीबाई फुलेंना त्या काळातील काही लोकांनी शेन व दगड का मारले?

उत्तर - मुलीना शिक्षण दिले जात होते म्हणून सावित्रीबाई फुलेंना त्या काळातील काही लोकांनी शेन व दगड मारले. 

प्रश्न - सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू कधी झाला?

उत्तर - सावित्रीबाईना प्लेगचा संसर्ग झाला त्यातच त्यांचा 10 मार्च 1897 रोजी पुणे येथे मृत्यू झाला. 

प्रश्न - सावित्रीबाई फुले यांच्या कवितासंग्रहाचे नाव काय?

उत्तर - सावित्रीबाईंच्या कवितासंग्रहाचे नाव काव्यफुले व बावनकशी सुबोध रत्नाकर हे आहे.

प्रश्न - भारतातील पहिली महिला शिक्षक कोण?

उत्तर - भारतातील पहिली महिला शिक्षक सावित्रीबाई फुले आहे.


हे ही वाचा


 

Previous Post Next Post