Maharashtra Schools : राज्यातील शाळा उन्हाळी सुट्टीनंतर 15 जून रोजी, तर विदर्भातील शाळा ‘या’ तारखेपासून होणार सुरू

Maharashtra School News : शैक्षणिक वर्ष 2023 24  शाळांबाबत एक महत्वाची अपडेट अशी आहे की, उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील शाळा (School Start) 15 जून 2023 रोजी सुरु होणार असून, विदर्भातील उन्हाची तीव्रता लक्षात घेता, त्या ठिकाणच्या शाळा या 30 जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागांतर्गत घेण्यात आलेल्या विविध निर्णयांबाबत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यावेळी ते बोलत होते. याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया..

राज्यातील शाळा 15 जून पासून तर विदर्भातील शाळा 30 जून पासून सुरू होणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Maharashtra School News

विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या तारखांविषयी संभ्रम राहू नये आणि त्यांना सुट्ट्यांचे नियोजन करता यावे यासाठी यावर्षीपासून राज्यातील शाळा 15 जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती, शालेय शिक्षणमंत्री यांनी दिली. उन्हाची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा 30 जून रोजी सुरू होतील असेही त्यांनी सांगितले.

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या पहिल्या पावलाचे होणार स्वागत

शाळेत दाखलपात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियानांतर्गत यावर्षी देखील मुलाच्या शाळेतील पहिल्या पावलाचे स्वागत केले जाणार आहे. शाळापूर्व तयारीचा पहिला मेळावा 26 एप्रिल पासून आणि दुसरा मेळावा जून महिन्यात घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

नव भारत साक्षरता कार्यक्रम राबविणार

केंद्राचा नव भारत साक्षरता कार्यक्रम राज्यातही राबविला जाणार आहे. यासाठी स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. यावर्षीपासून शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश तसेच वह्या, बूट आणि सॉक्स हे शासनातर्फे दिले जाणार आहेत. 

पुस्तकांमध्ये प्रत्येक धड्यानंतर टिपण (नोटस्) काढण्यासाठी आता एक पान कोरे ठेवले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी होईल, असा विश्वास श्री.केसरकर यांनी व्यक्त केला.

येत्या शैक्षणिक वर्षात 'आजी आजोबा दिवस'

येत्या वर्षापासून शाळांमध्ये 'आजी आजोबा दिवस' साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे श्री.केसरकर यांनी सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण दिले जाणार असल्याचे ते म्हणाले. 

विना अनुदानित शाळांना सरसकट 20 टक्के अनुदान

राज्यातील अघोषित व घोषित विनाअनुदानित शाळांना अनुदान उपलब्ध करून देण्याचा तसेच त्रुटी पूर्ततेनंतर अनुदानासाठी पात्र ठरलेल्या अघोषित शाळांच्या नैसर्गिक तुकड्यांना सरसकट 20 टक्के अनुदानासाठी पात्र घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. शिक्षक व सेवकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आली असून शिष्यवृत्तीच्या रकमेत देखील मोठी वाढ करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मानधन वाढ 1 जानेवारीपासून - सुधारित मानधन शासन निर्णय

मंत्री श्री.केसरकर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. शाळांमध्ये इंटरॅक्टीव्ह टीव्ही लावले जाणार आहेत. आदर्श शाळांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. 

विद्यार्थ्यांना मराठीकडे आकर्षित करण्यासाठी उच्च शिक्षणही मराठीमध्ये दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. इयत्ता बारावीच्या परीक्षा पुढील वर्षी होणार नाहीत हे खरे नसून पालक आणि विद्यार्थ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

    

Please do not enter any spam link in the comment box

Post a Comment (0)
Previous Post Next Post