दिव्यांग (अपंगांसाठी) असणाऱ्या कल्याणकारी योजना महाराष्ट्र 2023

महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे. समाजातील दुर्बल व दुर्लक्षित दिव्यांगांच्या जीवनातील अंध:कार दूर करून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे शिक्षण व प्रशिक्षण संदर्भात असलेल्या योजना, शिष्यवृत्ती योजना, दिव्यांग कर्ज योजना, मोफत कृत्रिम साहित्य साधने, दिव्यांग राज्य शासन पुरस्कृत योजना, दिव्यांग पेन्शन योजना, ग्राम पंचायत दिव्यांग योजना, दिव्यांगांसाठी असणारे दिव्यांग पोर्टल तसेच दिव्यांग सुविधा विषयी आजच्या लेखामध्ये माहिती घेणार आहोत. दिव्यांग व्यक्ती मध्ये असलेल्या सामर्थ्याकडे पाहून त्यांच्यामधील असलेले गुणसामर्थ्य विकसित करून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शासन वेगवेगळ्या स्तरावर शासकीय योजना राबवीत आहे. महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांगांसाठी असणाऱ्या विविध योजनांविषयीची माहिती आजच्या आर्टिकल मध्ये दिलेली आहे.

{tocify} $title={Table of Contents}

दिव्यांग (अपंगांसाठी) असणाऱ्या कल्याणकारी योजना महाराष्ट्र 2023

दिव्यांग कल्याण व पुनर्वसन - सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 

१९९५ मध्ये कलम ६० अन्वये दिव्यांग कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता १९ ऑगस्ट २००० च्या शासन निर्णयान्वये अपंग आयुक्तालयांना विभाग प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिव्यांग व्यक्तीसाठी शिक्षण व प्रशिक्षण व पुनर्वसनाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम आयुक्तालयाकडून केले जाते. सामाजिक न्याय विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या अपंग कल्याण व पुनर्वसन योजनांसाठी अनुदान वितरण करणे. योजनांवर नियंत्रण ठेवणे, योजनांमध्ये सुधारणा करणे व योजनेच्या अमलबजावणीची कामे आयुक्तालयाकडून केली जातात.

divyang yojana maharashtra
दिव्यांग योजना महाराष्ट्र
शासकीय संस्थेमधून शिक्षण व प्रशिक्षण शासकीय संस्थांमध्ये ६ ते १८ वयोगटातील अंध, कर्णबधीर व अस्थिव्यंग दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण पद्धतीने व विशेष शैक्षणिक साहित्याचा वापर करून मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. त्याचबरोबर निवास न भोजनाची विनामुल्य व्यवस्था करण्यात येते. त्याचबरोबर १८ वर्षांवरील विविध अपंग व्यक्तींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या दृष्टीने त्यांचे अपंगत्व विचारात घेऊन अपंगत्वानुरूप विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येते. त्याचप्रमाणे त्यांच्या निवास व भोजनाची विनामुल्य व्यवस्था करण्यात येते. दिव्यांग व्यक्तींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या दृष्टीने त्यांचे दिव्यांगत्व विचारात घेऊन दिव्यांग प्रकारानुसार विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येते.

➡️ दिव्यांग (अपंग) म्हणजे काय? दिव्यांग प्रकार 

दिनांक 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिना निमित्त स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय घोषणा उद्घाटन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. दिव्यांगांसाठी स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. आता यापुढे स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय या विभागाच्या मार्फत दिव्यांगांच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल.{alertInfo}

 ऐतिहासिक निर्णय ! राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन- 2 हजारहून अधिक पदं भरणार

दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना

दिव्यांग शाळेतील अनिवासी विद्यार्थी तसेच सामान्य शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत दिव्यांग विद्यार्थ्यांना उत्पन्नाची अट न लावता शालेय शिक्षणासाठी शालान्त पूर्व शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना दिव्यांग शिष्यवृत्ती देण्यात येते.

  • इयत्ता 1 ली ते 4 थी (अंध, अंशत: अंध, अस्थिव्यंग, कुष्ठरोगमुक्त तसेच कर्णबधिरांसाठी पायरी वर्गापासून) - दरमहा १०० रुपये
  • इयत्ता 5 वी ते 7 वी - दरमहा १५० रुपये 
  • इयत्ता 5 वी ते 10 वी दरमहा २०० रुपये (मतिमंद व मानसिक विकलांग विद्यार्थी) 
  • (नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त विशेष शाळांतील) दरमहा १५० रुपये, दिव्यांगांच्या कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थी दरमहा 300 रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते.

दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शालान्त परिक्षोत्तर (मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती)

अंध, अधूदृष्टी, कुष्ठरोगमुक्त, कर्णबधीर, अस्थिव्यंग, मतिमंद व मनोरुग्ण विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी नंतरचे महाविद्यालयीन व्यावसायिक, तांत्रिक व अभियांत्रिकी शिक्षणासाठी त्यांच्या अभ्यासक्रमाच्या दर्जाप्रमाणे अभ्यासक्रमाचे गट करून खालीलप्रमाणे शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात येते. त्याचबरोबर अंध विद्यार्थ्यांना वाचक भत्ता, तसेच दिव्यांगांसाठी शिष्यवृत्तीबरोबर शैक्षणिक शुल्क, प्रकल्प टंकलेखन खर्च, अभ्यासदौरा खर्चाची रक्कम दिली जाते. दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी आवश्यक ती शिष्यवृत्ती सहाय्य देण्यात येते.

  • वैद्यकीय व अभियांत्रिकी पदवी शिक्षण, ॲग्रिकल्चर, व्हीटरनरीमधील पदवी व पदव्युत्तर शिक्षण वसतिगृहात राहणारे दरमहा १२०० रुपये, वसतिगृहात न राहणारे ५५० रुपये देण्यात येतात.
  • अभियांत्रिकी, तांत्रिक स्थापत्य, वैद्यकशास्त्र, पदविका अभ्यासक्रम वसतिगृहात राहणारे दरमहा ८२० रुपये, वसतिगृहात न राहणारे ५३० रुपये देण्यात येतात. 
  • कला, विज्ञान, वाणिज्य मधील पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच व्यवसायिक पदविका अभ्यासक्रम शिकत असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना वसतिगृहात राहणारे ८२० रुपये आणि वसतिगृहात न राहणारे दरमहा ५३० रुपये देण्यात येतात.

  • द्वितीय वर्षे व त्यानंतर पदवीपर्यंतचा शिकणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना वसतिगृहात राहणारे ५७० रुपये आणि वसतिगृहात न राहणारे दरमहा ३०० रुपये दिले जातात.
  • ११वी, १२वी व पदवी प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम वसतिगृहात राहणारे ३८० रुपये आणि वसतिगृहात न राहणारे दरमहा २३० रुपये देण्यात येतात.
  • दिव्यांग व्यक्तींना वाचक भत्ता मासिक रुपये १००, ७५, ५०/- देण्यात येतो. शैक्षणिक शुल्क : मान्यताप्राप्त संस्थेचे / विद्यापिठाचे सक्तीच्या शैक्षणिक शुल्काची रक्कम, टंकलेखन खर्च- रु. ६००/- (वार्षिक) इ.) अभ्यास दौरा खर्च : रु. ५००/- इतके देण्यात येते.

दिव्यांग आर्थिक सहाय्य योजना - स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल 

१८ ते ५० वयोगटातील दृष्टीहीन, कर्णबधिर व अस्थिविकलांग दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी रुपये १,५०,०००, तर व्यवसायाकरिता ८० टक्के बँकेमार्फत देण्यात येते, तर रुपये ३०,०००/- सामाजिक न्याय विभागामार्फत अनुदान देण्यात येते.

दिव्यांग विद्यार्थ्यांना पारितोषिके योजना

दिव्यांग गुणवत्ता विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रत्येक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामधून इयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण होणान्या गुणवत्ता यादीतील प्रथम तीन क्रमाकांच्या प्रत्येकी तीन दिव्यांग विद्यार्थ्यांन १००० रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येते.

दिव्यांग क्रीडा स्पर्धा योजना

दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा दिव्यांगांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येते.

दिव्यांगाना मोफत कृत्रिम अवयव व साधने योजना

समाजातील प्रत्येक व्यक्ती संपूर्ण स्वावलंबी असावा ही मूलभूत संकल्पना आहे. परंतू नैसर्गिकरित्या आलेल्या शारीरिक मर्यादा व एक विशिष्ट मर्यादेपलीकडे न येणाऱ्या स्वालंबत्व यामुळे कित्येक व्यक्तींना दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहावे लागते. शारीरिक पुनर्वसनाच्या दृष्टीने दिव्यांगांकरिता त्यांच्या गरजेनुसार कॅलिपर, कृत्रिम अवयव, तीन चाकी सायकल, कर्णबधिरांकरिता श्रवणयंत्र, अंध विद्यार्थ्यांकरिता टेपरेकॉर्डर व कॅसेट्स तसेच इतर साहित्य साधनांसाठी ३००० रुपयांपर्यंतचे अर्थसाहाय्य देण्यात येते. यासोबतच ग्रामपंचायत यांच्या ५% निधीमधून देखील साहित्य साधने दिले जाते.

दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी अर्थसहाय्य योजना

अपंग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी स्वयंरोजगारासाठी बीजभांडवल योजना कार्यान्वित केली आहे. अपंग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय, धंदा, उद्योग, शेतीपूरक उद्योग सुरू करण्यासाठी शासकीय तसेच शासनमान्य संस्थेमधून १८ ते ५० वयोगटातील दिव्यांग व्यक्तींस अर्थसाहाय्य केले जाते.

राज्य शासन पुरस्कृत योजना

शासकीय तसेच शासनमान्य संस्थेमधून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या १८ ते ५० वयोगटातील दिव्यांग व्यक्तींस प्रशिक्षण पूर्ण केलेला व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या साधनांकरिता १००० रुपये अर्थसाहाय्य देण्यात येते.

दिव्यांग कल्याण राज्य पुरस्कार योजना

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दिव्यांग कर्मचारी / स्वयंउद्योजक, दिव्यांगांचे नियुक्तक यांना 'दिव्यांग कल्याण' राज्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

जागतिक दिव्यांग दिन

दिव्यांगत्वाविषयी जनजागृती निर्माण व्हावी, त्यांच्या समस्यांचे निराकरण होण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमाचे आयोजन करून समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात. यासाठी दरवर्षी ३ डिसेंबर जागतिक दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम आयोजन केले जातात. तसेच समता सप्ताह , जागतिक दिव्यांग सप्ताह साजरा करण्यात येतो.


दिव्यांग मार्गदर्शन व सल्ला केंद्र

दिव्यांग व्यक्तींना विविध सोयी सुविधांची माहिती व मार्गदर्शन करणे, तसेच त्यांना या सुविधा मिळवून देण्यासाठी समाज कल्याण अधिकारी कार्यालयात दिव्यांग मार्गदर्शन व सल्ला केंद्र कार्यरत आहे.

दिव्यांग व्यक्ती विवाह प्रोत्साहन योजना

दिव्यांग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना सुरू करण्यात आलेली आहे. किमान ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्त्व असलेल्या दिव्यांग वधू किंवा वराने दिव्यांगत्त्व नसलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास अथवा दिव्यांग नसलेल्या वधू किंवा वराने दिव्यांग असलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास ५०,००० रुपये अर्थसाहाय्य देण्याची तरतूद आहे.

दिव्यांग प्रवास सवलत

रेल्वे, एसटी महामंडळाकडून दिव्यांग व्यक्तीस प्रवास भाड्यामध्ये आणि त्याच्या मदतनीसाससुद्धा सवलत दिली जाते.

दिव्यांग मोफत प्रमाणपत्र

जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्त्वाचे मोफत प्रमाणपत्र दिले जाते.

वाहन भत्ता व व्यवसाय कर सवलत

दिव्यांगांना वाहन भत्ता व व्यवसाय करामध्ये सवलत देण्यात आली आहे.

दिव्यांग नोकरी आरक्षण

दिव्यांग व्यक्तींना शासकीय, निम शासकीय महामंडळे यांच्या नोकर भरतीमध्ये ४% आरक्षणाची सूट देण्यात आली आहे. 

दिव्यांग शिक्षण आरक्षण

शाळा, महाविद्यालय, वसतिगृह व तत्सम उपक्रम यांमधील प्रवेशामध्ये ५ टक्के इतके आरक्षण दिले जाते.आणखी वाचा

➡️ दिव्यांगांसाठी असणाऱ्या विविध अपंग कर्ज योजना

➡️ स्वावलंबन कार्डचे (UDID) फायदे 

➡️ सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय? | Cerebral Palsy Meaning 


नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                          

Previous Post Next Post